नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रोज तीन ते चार हजाराच्या पटीत कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. सर्वच खासगी आणि सरकारी हॉस्पिटलचे व्हेंटिलेटर बेड फुल झाले असून ऑक्सिजनची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशात अनेक हॉस्पिटलमधील ऑक्सिजन संपल्याने रूग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्याची वेळ नातेवाईकांवर येत आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मेडिकल ऑक्सिजनसाठी हेल्पलाइन स्थापन करण्यात आली आहे. यासाठी 9405869940 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अतिरिक्त जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोविडबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन करणाऱ्या विविध उत्पादकांनी त्यांच्या पुरवठादाराकडून मेडिकल ऑक्सिजन मिळवणे व विविध हॉस्पिटलने त्यांच्या कराराप्रमाणे स्थानिक उत्पादकांकडून ऑक्सिजन उपलब्ध करण्याची प्रचलित कार्यपद्धती कायम असणार आहे. परंतु सद्यस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत असल्यामुळे काही वेळा संबंधित हॉस्पिटलला पुरवठादारांकडून ऑक्सिजन मिळवण्यात अडचण निर्माण होत आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून अन्य पर्यायी व्यवस्था म्हणून हेल्प लाईन स्थापन करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा मेडिकल ऑक्सिजन कक्षाचे समन्वयक दत्तप्रसाद नडे यांनी सागितले आहे.
नाशिक महानगरपालिका, मालेगाव महानगपालिका व नाशिक ग्रामीण भागातील रुग्णालयांतील मेडिकल ऑक्सिजनसंबधी समस्यांच्या निराकरणासाठी जिल्हास्तरावर स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 9405869940 हा असल्याची माहिती दत्तप्रसाद नडे यांनी दिली.