नांदेड - मुसळधार पावसामुळे जिल्हाभरातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. याच झालेल्या मुसळधार पावसात नदीच्या पुलावरून बैलगाडी घेऊन जाणारा शेतकरी बैलगाडीसह वाहून गेल्याची घटना बिलोली तालुक्यात घडली आहे. शेतकऱ्याचे दैव बलवत्तर म्हणुन त्याच क्षणी तो झाडाचा आधार घेऊन झाडावर चढल्यामुळे त्याचे प्राण वाचले.
वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू -
नांदेड जिल्ह्यात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू आहे. जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस होत आहे. माहूर तालूक्यात आज दिवसभरात ५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड शहरात दुपारपासून तीन वेळा थांबून-थांबून पाऊस झाला. पुन्हा सायंकाळी पाच वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. माहूर तालूक्यातील अंजनी गावच्या शिवारात रविवारी सायंकाळी अंगावर वीज पडून शेतकरी आकाश भीमराव कुरसंगे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
नांदेड जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस - नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात आज दुपारनंतर जोरदार पाऊस झाला. यामुळे पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड शहर व जिल्ह्यात आज दि. 11 जुलै रोजी सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. नांदेड, लोहा, कंधार, देगलूर, मुखेड, बिलोली, नायगाव या भागात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू होती तर दुपारनंतर पावसाने जोर धरला होता. सायंकाळी पाचच्या सुमारास सिडको, लोहा-कंधार, सोनखेड, मुखेड, बाराळी, देगलूर, खानापूर, बिलोली, नायगाव, धर्माबाद उमरी, भोकरसह हदगाव, मुदखेड, अर्धापूर परिसरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. तसेच जिल्ह्यात अचानकपणे जोराचा पाऊस पडल्यामुळे जमिनी खरडून गेल्या आहेत. अनेक भागात पिकांमध्येही पाणी साचले आहे. दरम्यान नांदेड शहरातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले होते तर गटारे तुंबल्याने रस्त्यावरून हे पाणी वाहत होते. शहरातील अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते.
विष्णूपुरी धरणाचा तिसरा दरवाजा उघडला -
नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डॉ. शंकरराव चव्हाण विष्णूपूरी प्रकल्पात 100 टक्के पाणी साठा झाला असून आज सकाळी पाण्याचा येवा जास्त येत असल्याने तिसरा दरवाजाही उघडण्यात आला आहे. तसेच मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या इसापूर धरणाचाही साठा 50 टक्केच्या वर गेला आहे.