नांदेड - शहरासह जिल्ह्यात रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मेघ गर्जनेसह वादळी पाऊस झाला. त्यामुळे नागरिकांना उष्णतेतून थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र, यामध्ये फळबागांसह, उन्हाळी ज्वारी, भुईमूग, हळद, केळी व भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली होती. त्यातच शनिवारी आणि रविवारच्या वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वीज पडून शेतकऱ्यांची जनावरे ठार झाली आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण
रविवारी सायंकाळी वादळी पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. शनिवारी (दि.१) सायंकाळी जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट झाला. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचाही पाऊसही पडला. रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक वादळ-वाऱ्याला सुरुवात झाली आणि काही भागात एक तासाच्या वर जोरदार पाऊस बरसला. जवळपास जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे अर्धापूर, मारतळा, लोहा, हदगाव, उस्माननगर, बरबडा, मुदखेड आणि भोकरमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे.
भोकर तालुक्यात वीज पडून चार शेळ्या ठार
भोकर तालुक्यातील पोमनाळा येथील शेतकरी बाबू यशवंत सूर्यवंशी यांच्या दोन तर गोविंद रामा मोरे यांच्याही दोन बकऱ्या वीज पडून दगावल्या आहेत.
हदगाव तालुक्यात वीज कोसळून चार जनावरांचा मृत्यू
हदगाव तालुक्यातील खरटवाडी गावातील शेतकऱ्याच्या गोठ्यावर सायंकाळी ७ वाजता वीज कोसळून ४ प्राण्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. पावसाने हळदीचेही नुकसान झाले. आंबा, भाजीपालाही खराब झाला. गोविंद कोंडीबा शेंबूटवार ह्या शेतकऱ्यास पाच एकर जमीन आहे. त्यांच्याकडे एक बैलजोडी, एक गाय, वासरू असे पशुधन आहे. उन्हाळा असल्यामुळे गावातील गोठ्यात बैल बांधले होते. रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. गोठ्यावर वीज कोसळली. त्यामध्ये या शेतकऱ्याच्या चारही पशुधनाचा मृत्यू झाला. बैलजोडी ५० हजार, गाय-वासरू २५ हजार असे ७५ हजारांचे नुकसान झाले आहे.
कंधार तालुक्यात उन्हाळी ज्वारी व भुईमुगाचे नुकसान
जिल्ह्यात शेतकऱ्यांनी रब्बी व उन्हाळी हंगामावर लक्ष दिले होते. कंधार तालुक्यात उन्हाळी हंगामात ५ हजार ६०० भुईमूग व बिगर हंगामी सोयाबीन १५० हेक्टर लागवड पिकातून आर्थिक स्रोत शोधत असतानाच, अवकाळी पावसाने आडकाठी निर्माण केल्याचे चित्र आहे. वातावरणात झालेल्या बदलाने व काही गावातील पावसाच्या हजेरीने काढणीला खीळ बसत असल्याने शेतकरी चिंतित झाला आहे.
हेही वाचा - पुण्याजवळील नसरापूर येथे वीज कोसळून दोन मुलींचा जागीच मृत्यू, एक जखमी