नांदेड - जिल्ह्याच्या वेगवेगळया भागात बुधवारी(3 जून) वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. हदगाव तालुक्यात सतत तीन तास पाऊस झाल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. येत्या दोन तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून विविध भागात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री नांदेड शहरासह जिल्ह्यातील मुखेड, नायगांव, देगलूर, हदगाव, अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. बुधवारी हदगाव तालुक्यात सतत तीन तास पाऊस झाल्याने अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. तब्बल आठ तासाच्या परिश्रमानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा सुरुळीत केल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वाःस घेतला.
यंदा मान्सून वेळेवर तसेच पाऊस सरासरी इतका पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्या अंदाजाने सुखावलेल्या शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी मशागतीची तयारी सुरू केली. बी बियाणे, खताच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली. शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व साहित्याचा मुबलक साठा असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.