नांदेड : जिल्हा व शहर प्रशासनातर्फे अखेर 56 दिवसानंतर गुरुद्वारा तख्त सचखंड हुजूर साहिब परिसर भोवतालचा कंटेन्मेंट झोन आणि गुरुद्वारा श्री लंगर साहिब येथील झोन हटवण्यात आला आहे. नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या सहीने कंटेन्मेंट झोन उठवल्याचे परिपत्रक काढण्यात आले. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर आता गुरुद्वारा गेट नंबर एकचा मुख्य प्रवेशद्वार मार्ग मोकळा करण्यात आला त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, पोलीस अधीक्षक डॉ. विजय मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांनी गुरुद्वारा परिसर येथे भेट देऊन वरीष्ठ सहायक अधीक्षक रणजीतसिंघ चिरागिया यांच्याशी चर्चा केली. या प्रसंगी चिरागिया यांचा सत्कार करून त्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाचे आभार व्यक्त करणारे एक मानपत्र प्रदान केले. सदर सन्मानपत्र अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास यांच्या नावे असून त्यांनी बोर्डाचे आभार मानले आहेत. तसेच गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे मुख्य जत्थेदार संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले आणि संतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या नावाने गुरुद्वारा लंगरसाहेब तर्फे देण्यात आलेल्या सेवांबद्दलही आभार व्यक्त केले. आभार व सन्मानपत्र लंगर साहीबकडे प्रदान करण्यात आले.
मागील 56 दिवसापासून गुरुद्वारा होता बंद...
गेल्या 56 दिवसांपासून गुरुद्वारा सचखंड हजूर साहिब आणि गुरुद्वारा श्री लंगर साहिब परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करून बंद करण्यात आला होता. जवळपास दोन महीने हा परीसर बंद ठेवल्यामुळे शीख समाजात नाराजी वाढत होती. गुरुद्वाराचा कंटेन्मेंट झोन हटवण्यात आल्यामुळे गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष स. भूपिंदरसिंघ मिनहास, उपाध्यक्ष स. गुरविंदरसिंघ बावा, सचिव स. रवीन्द्र सिंघ बुंगई, बोर्डाचे सर्व सदस्य, अधीक्षक स. गुरविंदर सिंघ वाधवा यांनी समाधान व्यक्त केले आहे.