नांदेड - बिलोली येथे एका दुकानाला आणि घराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. प्रसिध्द व्यापारी साईनाथ अरगुलवार यांचे ते दुकान आणि घर असल्याची माहिती मिळत आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असून या भीषण आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बिलोली येथील गांधीचौक भागात असणारे आणि तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या अरगुलवार यांच्या घरातच असलेल्या श्री नारायण किराणा दुकानास मध्यरात्री अडीचच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आणि थोड्याच वेळात आगीने रौद्ररुप धारण केले. साईनाथ अरगुलवार हे दुसऱ्या मजल्यावर झोपले होते. अचानक त्यांना उष्णता जाणवू लागली, उठुन बघितल्यानंतर समोर धुर निघताना दिसु लागला. प्रचंड उष्णतेमुळे त्यांनी दुसऱ्याच्या घरावर उडी मारून मदतीसाठी आरडाओरडा केला. परंतु आग विझविण्यासाठी असणारे अपूर्ण साधन व मनुष्यबळाअभावी प्रयत्न करूनही आगीच्या रौद्रतेवर कसलाच परिणाम झाला नाही. या आगीत संपूर्ण घर, दुकानातील लाखोंच्या किमतीचा किराणा, घरातील दागदागिन्यांसहित गृहोपयोगी सामान आणि कपडे जळून राख झाले आहे.
बिलोली शहरात यापूर्वी अशा घटना घडल्यानंतर अग्निशमन दलाचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, नगर प्रशासनाने यावर आत्तापर्यंत कोणतेही प्रतिबंधक कार्य केलेले नसून मंगळवारी घडलेल्यार घटनेमुळे नागरिकांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.