नांदेड - किनवट तालुक्यात लाखो हेक्टर वनक्षेत्र आहे. या ठिकाणी वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. उन्हाळ्यामुळे येथील नैसर्गिक पाणीसाठे आटले आहेत. त्यामुळे वनविभागाकडून प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
किनवटच्या डोंगराळ भागात बिबट्या, कोल्हा, रानकुत्री, नीलगाय, तरस, भेकर, अस्वल, मोर, लांडोर, चितळ, सांबर यासारखे अनेक वन्यप्राणी वास्तव्यास आहेत. या भागातील नैसर्गिक पाणीसाठे मार्च महिन्यापासूनच आटल्याने या वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू होती. जंगलातील अनेक हिंस्र प्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीत आल्याच्या घटना समोर आल्या. यामुळे माणसाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. तर सांबर, रोही, नीलगाय, चितळ, हरीण, मोर यांसारख्या प्राण्यांची मानवाकडून शिकार होण्याचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे वनविभागाने डोंगराच्या माथ्यावर आणि घनदाट जंगलात जिथे नैसर्गिक पाण्याचे स्रोत उपलब्ध होते त्याठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.
वनविभागाने कृत्रिम पाणवठे तयार केल्याने पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येणाऱ्या वन्यप्राण्यांचे प्रमाण आता कमी झाले आहे. मानवावरील हिंस्र प्राण्यांचे हल्ले व इतर वन्यप्राण्यांची शिकर होण्याचे प्रकारही थांबले आहेत.