नांदेड - कोरोना असतानाही जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंत्ती निमित्त शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर दुसरीकडे चक्क हेलिकॉप्टरमधून शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरने झाली पुष्पवृष्टी -
नांदेडमध्ये यावर्षी अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर चक्क पुष्पवृष्टी करण्यात आली. सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीकडून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. समितीचे अध्यक्ष अंकुश देवसरकर आणि स्वागताध्यक्ष धनंजय पाटील यांनी ही पुष्पवृष्टी केली. हेलिकॉप्टरमधून होणारी पुष्पवृष्टी पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे पुष्पवृष्टीसाठी विलंब झाला.
जयंती उत्साहात साजरी -
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती साध्यापध्दतीने साजरी करावी, असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले होते. त्यामुळे शहरात कुठेही रॅली काढण्यात आली नाही. सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रम, रक्तदान, अन्नदान, यासारखे विविध कार्यक्रम घेऊन जयंती साजरी करण्यात आली.
शिवप्रेमींमध्ये उत्साह -
शिवजयंतीची तयारी झाली होती. मात्र, शहरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. दुपारी बारावाजेपर्यंत पाऊस सुरू होता. तर दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळले, तरीदेखील शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली.
हेही वाचा - 'सर्व सरकारी अधिकाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याची सक्ती हवी'