नांदेड - शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून जबरी चोरीचे प्रकार प्रचंड वाढले होते. या घटनेतील आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे कडवे आव्हान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वीकारले आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लंगर साहिब परिसरातून पाच जणाला घातक शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.
पोलिसांसमोर होते मोठे आव्हान
शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसापासून जबरी चोऱ्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. दोनच दिवसांपूर्वी राज कॉर्नर ते विमानतळ मार्गावर डीआरएम ऑफिस समोर दुचाकीवरून जाणाऱ्या बहीण-भावाला अडवून धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटल्याची घटना घडली होती. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय शहर आणि परिसरातही अशाच प्रकारच्या अनेक घटना घडत होत्या. या घटनेतील दरोडेखोरांना बेड्या ठोकण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
हेही वाचा - ओडिशाच्या एका गावात एकाच कुटुंबातील 6 जणांची हत्या
स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लंगर साहिब गुरुद्वारा परिसरात काही आरोपी लपल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती पोलिस निरीक्षक चिखलीकर यांनी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना दिली. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याच आदेश दिले. यानंतर पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईसाठी रवाना केले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगीनाघाट परिसरात लंगर साहेब गुरुद्वारा जवळ आरोपी अनिल उर्फ पंजाबी सुरेश पवार (रा. गोविंद नगर), सोनूसिंग राजेंद्रसिंग चव्हाण (रा. भगतसिंग रोड), अब्बास हाफिज रहमत अन्सारी (रा. कसाईपुरा औरंगाबाद), संदीपसिंग गोविंदसिंग चव्हाण (रा. गुरुद्वारा गेट क्रमांक एक) आणि लखन नागोराव कोलथे (रा. धनेगाव) या पाच जणांना ताब्यात घेतले.
अनेक गंभीर गुन्ह्याची कबुली, मुद्देमाल ताब्यात
आरोपीची कसून चौकशी केली असता डीआरएम समोरील बहीण-भावाला लुटण्याच्या घटनेसह अनेक गंभीर गुन्ह्याची त्यांनी कबुली दिली आहे. आरोपींकडून अनेक मोबाईल, चांदीच्या अंगठ्या, धारदार हत्यारे, मोटारसायकल असा एकूण एक लाख 34 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे.
हेही वाचा - अट्टल चोरट्यांकडून चेन स्नॅचिंगसह जबरी चोरीचे 6 गुन्हे उघडकीस; कराडच्या गुन्हे शाखेची कारवाई