नांदेड - संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पांगरी (ता.अर्धापूर) येथील शेतकऱ्यांच्या केळी बांधावरून थेट इराणला निर्यात करण्यासाठी पहिली गाडी रवाना झाली. हा माल मुंबईतील बंदरावरून जहाजाद्वारे पाठविण्यात येणार आहे. केळी सातासमुद्रापार जाण्याच्या वाटा खुल्या झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत.
आपल्या प्रतिक्रिया देताना शेतकरी व व्यापारी कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे केळीचे दर प्रचंड खाली आले होते. अत्यल्प दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचा लागवडी खर्च निघणेही अवघड होऊन बसले होते. पण, मागील काही दिवसात मागणी वाढल्याने केळीच्या दरात बऱ्यापैकी सुधारणा झाली आहे. निर्यात केळीसाठी एक हजार रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर परिसरासह विविध ठिकाणी केळीचे उत्पन्न घेतले जाते. कोरोना आणि टाळेबंदीमुळे केळीच्या दरात मोठी घसरण झाली होती. टाळेबंदीमध्ये दळणवळण व्यवस्था बंद असल्याने केळीची निर्यात थांबली होती. त्यामुळे परराज्यासह विदेशातही केळीची मागणी कमी झाली होती. त्यामुळे केळीच्या दराने निचांक गाठला होता. मात्र, टाळेबंदीमध्ये शिथिलता होताच परराज्यात केळीची मागणी वाढत असल्याने केळीच्या दरात चांगली सुधारणा झाली आहे. जिल्ह्यातील अर्धापूर परीसरात पिकणारी केळी ही खाण्यासाठी चविष्ट व टिकाऊ असल्यामुळे मोठी मागणी असते. चांगले पर्जन्यमान आणि इसापूर-येलदरी धरणात चांगला पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे केळीची लागवड झाली होती. नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यात केळी पाठविणे सुरू आहे. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांत समाधान असून दराच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. दर्जेदार केळीची निवड करून बांधावरच मागणीप्रमाणे पॅकींग करून गाडी भरण्यात आली आहे. ही गाडी मुंबईच्या बंदरावरून प्रिकुलिंग करून इराणसाठी रवाना होणार आहे. तसेच येथील केळींची मागणी वाढल्यास केळीच्या दरातही चांगली सुधारणा होईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - पीककर्जाचे तात्काळ वाटप करा, नांदेडात भाजपचे जिल्हा बँकेसमोर आंदोलन