नांदेड - सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) कायद्याविरोधात नांदेडमध्ये गेल्या 15 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यादरम्यान आंदोलनस्थळी चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी स्टुडंटस् इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र साऊथ झोनचे अध्यक्ष महंमद सलमान अहमद यांच्याविरुद्ध इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - नांदेड : प्रेमी युगुलाला लुटणाऱ्या तीनही आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
मुस्लीम समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर आंदोलकांनी देगलूर नाका या मुस्लीमबहुल भागात कापूस संशोधन केंद्रालगत पुन्हा आंदोलन सुरू केले. आंदोलनस्थळी असलेल्या व्यासपीठावरून चिथावणीखोर भाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर चिथावणीखोर भाषण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत भाजपाने पोलीस प्रशासनास निवेदन दिले.
त्यामुळे आक्षेपार्ह संभाषणाची दखल घेत इतवारा पोलिसांनी महंमद सलमान अहमद याच्याविरुद्ध कलम 153, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - अर्धापूर तालुक्यात सालगडी शेतमजुराची आत्महत्या...!