नांदेड - जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, ज्वारी यांसह सर्व खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नुकसाभरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्याचा नाकीनऊ येत आहेत. यासाठी शेतकऱ्याची कृषी कार्यालयासमोर मोठी गर्दी होत आहे.
गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात सलग पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी, कापूस या पिकाला सततचा होणारा पावसाचा मारा असह्य झाला आहे. शिवारातील कापणी केलेल्या सोयाबीन व ज्वारी पिकाला सुरक्षित ठेवायला संधी मिळाली नाही. त्यामुळे ही पिके हातची गेली. सततच्या पावसाच्या हजेरीमुळे सखल भागात शेतात पाणी साचले आहे. अतिपावसाने कापसाचे पीकही वाळली आहेत. कापणी केलेली पिके सडून गेली आहेत. गेल्या अनेक दिवसापासून जिल्ह्यात मोठा पाऊस सुरू आहे. पण तो कापणी केलेल्या पिकांची नासाडी करण्यास कारणीभूत ठरला. कापणी केलेले सोयाबीन, ज्वारी गोळा ठेवले होते. त्यांनाही जागेवरच कोंब फुटली, तर उभ्या असलेल्या सोयाबीन व कापसालाही अतिपावसामुळे कोंब फुटली आहेत. जवळपास खरीप हातचा गेला आहे.
हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला. समोर डोळ्यादेखत नुकसान दिसत असताना मात्र प्रशासनाकडून कुणीच दखल घ्यायला तयार नाही. त्यांना नुकसानी बदल सांगितल्यास विमा कंपनीची वेबसाईट अन् क्रमांक देत आहेत. हा फोन लागत नाही आणि वेबसाईटवर काय करायचे ते शेतकऱ्यांना समजत नाही.
अर्धापूर येथे मंगळवारी तालुका कृषी कार्यालयासमोर पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची एकच गर्दी झाली होती. आज शेवटची तारीख आहे म्हणून शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. या अर्जासोबत नुसानभरपाईचा अर्ज, विमा भरलेली पावती, आधारकार्ड, सातबारा, बँक पासबुक आदी कागदपत्रे सोबत जोडावी लागत आहे. पण ही सारी कागदपत्रे अगोदरच जोडली असताना पुन्हा कशासाठी मागवले जात आहेत, असा सवाल शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही' शी बोलताना आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ पाटील कपाटे यांनीही सरसकट विमा देण्यासाठी निवेदन दिले आहे. तसेच तालुका कृषी कार्यालयासमोरची गर्दी लक्षात घेऊन येळेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य बबनराव बारसे यांनी तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून यावर तोडगा काढला. गावातच आता तक्रारी घेण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.