नांदेड - अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्काळ मदत केंद्र सुरू करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, अध्याप एकाही पदाधिकाऱ्यांने विचारणा केली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जिल्ह्यातील लोहा आणि कंधार तालुक्यात आले होते. थेट बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. परतीच्या पावसात सोयाबीन, कापूस, भाजीपाला आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पीकविमा, बँक अधिकऱ्यांचं आडमुठं धोरण, प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी तत्काळ मदत केंद्र सुरू करन्याचे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना ठाकरे यांनी दिले होते. उद्धव ठाकरे यांनी जानापुरी येथील शेतकऱ्यांना भेट दिली होती. शेतकऱ्यांनी अनेक समस्यांचा पाढा ठाकरे यांच्या पुढं वाचला होता. यावेळी शेतकऱ्यानी चिंता करूनये शिवसेना आपल्या पाठीशी आहे, अशी समजूत काढली होती. मात्र, ठाकरे मुंबईकडे परतल्या नंतर एकही पदाधिकारी शेतकऱ्यांच्या समस्या विचारायला आला नसल्याची खंत जानापुरी येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे सरकार स्थापन करण्याचा तिढा कायम आहे, तर दुसरीकडे राज्यपालांनी हेक्टरी आठ हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. यामुळे बळीराजा पुढच्या समस्या आणखी वाढल्या अश्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे दौऱ्यावर आले, त्यांनी पाहिलं आणि ते गेले. हा दौरा म्हणजे केवळ औपचारिकता होती का..? असा सवाल विचारला जात आहे.