नांदेड - जिल्ह्यातील शेतकरी कोरोनामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकरी ग्रासला आहे. पुढील महिन्यातील रमजान डोळ्यासमोर ठेवून केळीची लागवड केली होती. सरकारकडून शेतमालाच्या वाहतुकीसाठी अडचण नसल्याचे सांगितले जात असले तरी 'केळी' खरेदी करायला कोणीच तयार नाही, अशी प्रतिक्रिया केळी उत्पादकातून उमटत आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा फटका बसणार आहे.
जिल्ह्यातील 'अर्धापूरी' केळीची चव संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे. या भागातील केळीला मोठी मागणी असून विदेशातही निर्यात होता. गतवर्षी या केळीला क्विंटली दीड ते दोन हजार रुपये दर होता. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे कुणी केळी खरेदी करायला तयार नाही. काही एखाद-दोन व्यापारी येत आहेत. पण केवळ चारशे ते पाचशे दरम्यानच्या दराने केळी खरेदी करत आहेत.
माझ्याकडे तीन हजार दोनशे केळीची झाडे आहेत. केळी उत्पादन करण्यासाठी रोप (बेणे), ठिबक, खते, मजूरी यांसह दिड लाख रुपये खर्च झाला आहे. केळी हे पीक खूप नाजूक असून त्याची काटेकोरपणे काळजी घेऊन उत्पादन करावे लागते. इतके जपुनही उत्पन्न तर बाजूलाच राहिले पण लागवडीसाठी केलेला खर्च निघणे अवघड आहे, अशी प्रतिक्रिया चोरंबा ना. (ता.अर्धापूर) येथील शेतकरी माधवराव कल्याणकर यांनी दिली.