नांदेड : केळी काढणीला आलेली असतानाच वादळी वाऱ्याने शेतातील उभ्या केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. मुदखेडमधील डोंगरगाव, धनज आणि बारड शिवारात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या पडल्या असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. काल मध्यरात्री या भागात मोठा पाऊस झाला. आज पुन्हा वादळी वाऱ्याने या शिवारातील शेतकऱ्यांच्या तोंडासमोर आलेला घास हिरावून नेला आहे.
अवकाळी पावसामुळे बागा उद्धवस्त : नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यात शेतकऱ्यांच्या पिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा आहेत, त्यांचे जास्त नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वातावरणातील बदल झाल्याने अवकाळी पाऊस पडत असतो. यामुळे शेती मालाचे प्रचंड नुकसान होत आहे. अर्धापूर बारड , मुदखेड भागात केळीच्या प्रचंड लागवड करण्यात आली आहे. या भागातच मागील दोन महिन्यात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यात काही शिल्लक राहिलेल्या केळीच्या बागा रात्रीच्या वादळी वाऱ्यामुळे आडव्या पडल्या. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गारपिटीच्या शक्यता : हवामान विभागाने गारपिटीच्या शक्यतेचा अंदाज वर्तविला होता. तालुक्यात गारपीट व वादळी वाऱ्याने शेतीला मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील दाभड, मालेगाव, अर्धापूर या तीनही मंडळातील काही गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. यामध्ये मुदखेड अर्धापूर या दोन्ही तालुक्यातील गावांना फटका बसला आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे. अर्धापुर तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटीच्या तडाख्याने केळीसह पपईच्या, आंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तालुक्यातील अनेक भागात मंगळवारी, दुपारी गारांसह अवकाळी पाऊस झाला होता.त्यामुळे हळद, केळी, पपई आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे.
या पिकांचे झाले नुकसान : यामध्ये प्रामुख्याने वाळणीसाठी व शिजवणी सुरू असलेल्या हळद पिकाचे नुकसान झाले आहे. उभे असलेले ज्वारीचे पीक, आंबा, भाजीपाला, फुलशेती आदी पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कोंढा, कामठा, गणपुर, पिंपळगाव, बामणी, देळूब, सावरगाव, पार्डी, हिवरा आदी ठिकाणी केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे या भागातील केळी आणि पपईची झाडे उन्मळून पडली आहेत. हाती आलेल्या पिकांचे डोळ्यांसमोर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.
हेही वाचा -