नांदेड - सततच्या नापिकीमुळे आणखी एका शेतकऱ्याने आपले जीवन संपवले आहे. मुखेड तालुक्यातील वर्ताळा येथील गोविंद आगलावे या तरुण शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. कधी कोरडा, तर कधी ओल्या दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. परतीच्या पावसाने राज्यभरात थैमान घातले आहे. सततच्या नापिकीला कंटाळून तालुक्यातील वर्ताळा येथील तरुण शेतकरी गोविंद माणिक आगलावे (वय 30) यांनी आत्महत्या केली आहे. डोक्यावर कर्जाचा डोंगर, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि त्यातच सततच्या नापिकीला कंटाळून गोविंदने टोकाचं पाऊल उचलल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
शेतामध्ये उभे सोयाबीन, कापूस व ज्वारी ही पिकं पुर्णपणे हातातून गेली आहेत. डोक्यावर असलेले कर्ज कसे फेडायचे व मुलांचे शिक्षण कसे करायचे? या विवंचनेतून गोविंद यांनी गळफास घेतल्याचे काही गावकऱ्यांनी सांगितले. ३१ ऑक्टोबरला पत्नी ज्योती दीपावलीच्या निमित्ताने माहेरी गेल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीत गोविंदने घरातील धुळीला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. घटनेचे वृत्त समजताच तलाठी, मंडळ अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला. त्यानंतर गोविंदचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, मुखेड येथे पाठवण्यात आला. त्याच्यापश्चात पत्नी, मुलगा व बहिण असा परीवार आहे.