नांदेड - जिल्ह्यातील पार्डी म.(ता. अर्धापूर) येथील शेतकऱयाने सततच्या नापिकीला व कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज (३ मे) दुपारच्या सुमारास घडली. चंद्रकांत श्यामराव देशमुख (वय-४३) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील पार्डी म.येथील शेतकरी चंद्रकांत श्यामराव देशमुख यांच्यावर बँक ऑफ इंडियासह विविध बँका व खासगी कर्ज होते. त्यांच्या शेतात केळीचे पीक होते. परंतु, काही दिवसापासून दुष्काळामुळे केळीला पाणी कमी पडत होते. त्यातच लोडशेडिंगमुळे पाणी देणे शक्य नव्हते. दरम्यान, यावर मोठा खर्च करूनही सतत नापिकी होत होती.
या विवंचनेतून चंद्रकांत यांनी दुपारी १२ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मृताचे भाऊ राजेश्वर देशमुख यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आर. टी. नांदगांवकर करत आहेत.