नांदेड - रेल्वे भरती बोर्ड परिक्षेच्या ग्रुप-डी पदाच्या परीक्षेत अन्य परीक्षार्थीच्या माध्यमातून परीक्षा देणार्या उमेदवाराला रेल्वेच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतले आहे. या उमेदवाराची सखोल चौकशी करून त्यास विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
नुकतेच काही महिन्यापुर्वी रेल्वे भरती बोर्डाची ग्रुप-डी पदासाठी परीक्षा झाली. या परीक्षेत एका उमेदवाराने आपल्या ऐवजी अन्य एकाला परीक्षा द्यायला लावली. निकाल जाहीर झाल्यानंतर सदरील उमेदवार कागदपत्र तपासणीसाठी नांदेडच्या रेल्वे विभागीय व्यवस्थापक कार्यालयात आला. यावेळी रेल्वेच्या अधिकार्यांनी कागदपत्र तपासणी दरम्यान त्याने परीक्षेत गौडबंगाल केल्याचे उघड केले.
या उमेदवाराची चौकशी करून त्यास विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अद्याप सदरील उमेदवाराचे नाव कळू शकले नाही. दरम्यान, बोगस परीक्षार्थ्याच्या माध्यमातून रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षा देणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.