नांदेड : नांदेड येथे पोलीस भरतीत बनावट प्रमाणपत्र दाखल केल्याप्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात आत्तापर्यंत 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2022 - 23 या वर्षासाठी नांदेड येथे पोलीस भरती घेण्यात आली. यावेळी लातूर जिल्ह्यातील 9 जणांनी भूकंपग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र दाखल केलं. पोलिसांनी याची पडताळणी केली असता हे प्रमाणपत्र बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे.
दलालांमार्फत खोटे प्रमाणपत्र तयार केले : आठ दिवसांपूर्वी 2 जणांविरोधात बनावट प्रमाणपत्र सादर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन महिलांसह एकूण 9 जणांनी बनावट कागदपत्र तयार करून भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र काढले. दलालांमार्फत हे प्रमाणपत्र तयार केलं जात असल्याचं समोर आले आहे. वजीराबाद पोलीस पुढील तपास करत आहेत.
फसवणुकीचा गुन्हा दाखल : वजिराबादचे सहायक पोलिस निरीक्षक रामदास केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 2020 ते 2023 पर्यंत लातूर आणि नांदेड येथे भूकंपग्रस्त कोट्यातून शासकीय नोकरी मिळविण्याचा हेतूने एकाने दत्तकपत्र तयार केले. त्या आधारावर भूकंपग्रस्त बनावट प्रमाणपत्र हस्तगत करून त्याने ते प्रमाणपत्र नांदेडच्या पोलिस भरती प्रक्रियेत वापरले. या संदर्भाने सर्व दस्तऐवज आणि त्यातील प्रक्रिया पूर्ण करण्याची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षक रामदास केंद्रे यांनी पूर्ण केली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल : या गुन्ह्यात आरोपी सुमनबाई सुग्रीव सूर्यवंशी (70, रा. नदीहत्तरगा, ता. निलंगा, जि. लातूर), मीरा शिवाजी बोबडे (45), रतनबाई विनायक लोहकरे (58, रा. कारतळा, ता. कंधार, जि. नांदेड), ज्ञानोबा शिवाजी बोबडे (25 रा. तळणी, ता. रेणापूर, जि. लातूर), शिवाजी प्रल्हाद बोबडे (51), बालाजी सीताराम सरपाते (रा. सांगवी (जे), ता. निलंगा, जि. लातूर), संभाजी विनायक लोहकरे (32), विनायक दिगंबर लोहकरे (60, रा. कारतळा, ता. कंधार, जि. नांदेड) यांचा समावेश आहे. पोलिस उपनिरीक्षक जयश्री गिरे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :