नांदेड - प्रकल्पातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. शेती आणि उद्योगासाठी प्रकल्पातून पाणी उपसा करू नये, असे आवाहन जिल्ह्याचे पालक सचिव तथा रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले. ते टंचाई परिस्थितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात बोलत होते.
जलसंधारण व रोहयोचे सचिव एकनाथ डवले यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीची आढावा बैठक नियोजन भवन येथे घेतली. यावेळी त्यांनी पिण्याचे पाणी, रोजगार, चारा छावणी यासारखी महत्वाची कामे हाती घेण्याच्या सूचना अधिकारी-कर्मचाऱ्यांना केल्या आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्राधान्यांनी कामे करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.
यावर्षी मान्सून पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार शहरी व ग्रामीण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. मागणीनुसार नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी पाणी पुरवठा यंत्रणेची आहे. त्यासंदर्भात नागरिकांची कोणतीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश डवले यांनी दिले.
विष्णुपुरी जलाशयासह मुखेड तालुक्यात टंचाईग्रस्त गावांची पाहणी
पालक सचिव डवले यांनी असना व विष्णुपुरी जलाशयातील पाण्याच्या पातळीची पाहणी केली. त्यानंतर मुखेड तालुक्यातील मोटरगा, बोरगाव, भगनुरवाडी व तांदळीतांडा या गावातील नागरिकांशी संवाद साधला. तेथील मनरेगाच्या कामांची पाहणी केली. मुखेड तालुक्यात चारा छावणीची मागणी लक्षात घेऊन ती सुरू करण्याची सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केली. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर उपस्थित होते. याबरोबरजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.