नांदेड - गाईच्या शेणापासून इकोफ्रेंडली गणेश मूर्ती बनवण्याचा स्तुत्य उपक्रम एका गोशाळेने सुरू केला आहे. गणेश मूर्तींच्या साच्यातून अतिशय सुबक अशा गणेशमूर्ती तयार केल्या जातात. गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पोखरभोसी (ता.लोहा) येथील श्रीकृष्ण गोशाळेतून गाईचे शेण आणले जाते. सध्या कोरोनाच्या परिस्थितीतही एक चांगला पर्याय शोधला असून कुटुंबातील प्रत्येक सदस्य या कामात गुंतला आहे. गाईच्या शेणापासून इकोफ्रेंडली मूर्ती बनवल्या जाव्यात आणि त्यातून गोसंरक्षणाचा संदेश द्यावा, या हेतूने शेणापासून या मूर्ती बनवण्याचा हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.
आपला गणेश - गोमय गणेश...! आपला गणपती - पर्यावरणपूरक गणपती...!
या पर्यावरण बचाव व स्वावलंबी गोशाळा अभियानातून गावरान गाईच्या शेणापासून गोमय गणेश मूर्ती साकारणारी पोखरभोसी (ता.लोहा) येथील ही श्रीकृष्ण गोशाळा मराठवाड्यातील पहिली व एकमेव गोशाळा ठरली आहे.
लोकसहभागातून चालविले जाते गोशाळा....!
ह. भ. प. डॉ. बाळासाहेब साजणे यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली या गोशाळेत कुपोषित, म्हाताऱ्या, अपंग व देवाला सोडलेल्या अशा 113 गायी सांभाळल्या जातात. नांदेडच्या गुजराती समाज, जैन समाज, माहेश्वरी समाज, प. पू. सिंधी समाज व अनेक गोभक्त-गोप्रेमी यांसारख्यांच्या योगदानातून व लोकसहभागातून ही गोशाळा चालविली जाते.
गाईला सामाजिक प्रतिष्ठा मिळण्यासाठी बनवल्या मूर्ती
गोशाळा स्वयंपूर्ण व्हावी व गाईला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होऊन गावरानी गाईंच्या रक्षणाबरोबर रोजगार निर्मिती व्हावी. प्लास्टर ऑफ पॅरीसला मूठमाती देऊन पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढावा हा हेतू ठेवून गतवर्षी पंधरा गोमय गणेशमूर्ती बनविण्यात आल्या होत्या. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला व वाढती मागणी लक्षात घेऊन यावर्षी या मूर्ती मोठ्या प्रमाणावर बनविण्याचे ठरले.
कोरोनाच्या संकटातही घोरबांड कुटुंबीयांचा पुढाकार
त्यातच कोरोनाच्या थैमानामुळे आरोग्य विभागाच्या सूचना पाळून हे करणे शक्य झाले नाही. पण घोरबांड कुटुंबीयांनी हार न मानता कुटुंबातील सदस्यांनीच या कामी पुढाकार घेतला. गत दोन महिन्यांपासून हे काम सुरू केले आहे.
आजपर्यंत जवळपास सहाशे ते सातशे गोमय गणेश मूर्ती तयार असून एक हजार मूर्ती बनविण्यात येणार असल्याचे सांगितले. या गणेश मूर्ती पूर्णतः गावरान गाईचे शेण व खाद्यरंग,चुना, अष्टगंध, अबीरबुका यांचा वापर करून बनवण्यात येत आहेत.
गणेश मूर्ती पर्यावरणाला पूरक...
मूर्तींचे विसर्जन घरीच बादलीत पाणी घेऊन करावे व 8 दिवसांनंतर ते पाणी अंगणातील तुळस व इतर वृक्षांना टाकल्यास संजीवनी ठरेल. या मूर्ती नदीत विसर्जित केल्यास अनेक जलचरांना खाद्य नदी किनाऱ्यावरील झाडांना खत व जल शुध्दीकरण असे फायदे मिळतील, असे गोशाळेकडून सांगण्यात आले आहे.
अगोदरच बुकिंग असल्यामुळे मार्केटिंगची गरजही पडली नाही
पूर्वनोंदणी करूनच मूर्तींची निर्मिती केल्यामुळे मार्केटिंगची समस्या राहिली नाही. आजही अनेक पर्यावरण प्रेमी, गणेशभक्त आणि गोभक्तांकडून या मूर्तींची मागणी चालू आहे. मात्र, मर्यादित प्रमाणात मूर्ती बनवल्या असल्याने गोशाळेकडून दिलगिरी व्यक्त करुन पुढील वर्षी आणखी मूर्ती तयार करणार असल्याचे सांगितले आहे. परभणी, उमरखेड, पुसद या बाहेरच्या जिल्ह्यातूनही गोमय गणेश मूर्तींची मागणी जोर धरत आहे.
पंचगव्य-गोमय वस्तूंचा वापर गोरक्षरणाला आधार होऊन गोशाळा स्वावलंबी बनवण्यास मदत होईल. बेरोजगार, शेतकरी, शेतमजुरांना निःशुल्क प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते, अशी माहिती प्रल्हाद घोरबांड यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.