नांदेड - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने पुर्ण तयारी केली असून विधानसभा निवडणुकीवर जिल्हा प्रशासन व निवडणूक विभाग बारकाईने नजर ठेवणार आहे. यात सोशल मीडियावर माध्यमांवर कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरूण डोंगरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शनिवारपासून सुरू झाली. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून पुर्ण तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ९ मतदार केंद्रावर २५ लाख ४२ हजार ४५० मतदार २९५५ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
९ विधानसभा मतदार संघासाठी २७ सप्टेंबरपासून निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्टोबर आहे. छानणी ५ ऑक्टोबर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ७ ऑक्टोबर तर मतदान - २१ ऑक्टोबरला घेतले जाणार आहे. प्रत्येक मतदार संघात २४ ऑक्टोबरला मतमोजणी केली जाणार आहे.
जिल्ह्यात ९ विधानसभा मतदारसंघ असून, यामध्ये किनवट ३२८ मतदान केंद्र, २ लाख ५९ हजार २७२ मतदार , हदगाव ३१९ मतदान केंद्र , २ लाख ७८ हजार ७३५ मतदार, भोकर ३२४ मतदान केंद्र, २ लाख ७८ हजार ४५० मतदार, नांदेड दक्षिण ३३६ मतदान केंद्र, ३लाख ११ हजार ९६८ मतदार, नांदेड उत्तर ३०७ मतदान केंद्र, २ लाख ८४ हजार ११४ मतदार, लोहा ३१२ मतदार केंद्र, २ लाख ७३ हजार २२२ मतदार, नायगाव ३४२ मतदान केंद्र, २ लाख ८३ हजार ६७ मतदार, देगलूर राखीव ३४६ मतदान केंद्र, २ लाख ९१ हजार ४७४ मतदार आणि मुखेड ३४१ मतदार केंद्र, २ लाख ८२ हजार १४८ मतदार असून एकूण २९५५ मतदान केंद्रावर २५ लाख ४२ हजार ४५० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत . यामध्ये १३ लाख १८ हजार ४३५ पुरूष, १२ लाख २३ हजार ९३६ महिला तर ७९ तृतीय पंथी असे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत . जिल्ह्यातील प्रत्येकी विधानसभा मतदार संघात एक आदर्श मतदान केंद्र, एक दिव्यांग केंद्र आणि एक महिला मतदान केंद्र याप्रमाणे मांडणी राहणार आहे. एकूण ७५ मतदान केंद्र संवेदनशील असून अतिसंवेदनशील केंद्र जिल्ह्यात एकही नाही. उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च बँकेत खाते उघडून बँकेमार्फत करावा. २८ लाखापर्यंत एका उमेदवाराला खर्च करता येईल.
सर्वसाधारण उमेदवारासाठी १० हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागेल. राखीव उमेदवारासाठी ५ हजार रुपये रक्कम जमा करावी लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ . सचिन खल्लाळ यांची उपस्थिती होती.