नांदेड - सततच्या वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पिण्याचे पाणीही मिळणे कठीण झाल्याने नांदेड जिल्ह्यात पाणीबाणी लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे तब्बल 133 टँकरनी पाणीपुरवठा करावा लागत आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नाही, तर पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच बिकट होणार आहे.
उष्णतेमुळे गेले काही दिवस नांदेडकर अक्षरशः होरपळून निघत आहेत. मागील आठवडाभर नांदेडचे तापमान 45 अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. एका बाजुला तापमान वाढत असताना दुसरीकडे पाणी टंचाईची समस्याही गंभीर होत चालली आहे. मात्र, प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाहीत.
जिल्ह्यात 133 टँकरद्वारे पाणीपुरवठा -
सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात 133 टँकरद्वारे 77 गावे आणि 26 वाडी - तांड्यावरील 1 लाख 95 हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे . सर्वाधिक टँकर मुखेड तालुक्यात सुरू आहेत. मुखेड तालुक्यातील 27 गावे, 15 वाड्यांवर, 55 खाजगी व 5 शासकीय अशा एकूण 60 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यानंतर नांदेड तालुक्याला 19 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. लोहा तालुक्यात 17 टँकर सुरू आहेत . तर कंधार मध्ये 7 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे . लोहा नगरपालिका हद्दीतही 8 टँकर सुरू आहेत. याबरोबरच हदगाव तालुक्यातही 6 टँकरने पाणीपुरवटा सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात 1 हजार 60 गावांमध्ये टँकरसाठी 90 तर टँकर व्यतिरिक्त 661 गावांतील अशा एकूण 1 हजार 66 खाजगी बोअर व विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे. याद्वारे नागरीकांना पाणीपुरवठा केला जात आहे.
एकूणच प्रशासकीय पातळीवर पाणीटंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी अनेक गावात टँकरद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी आहेत. कागदावर दाखवलेल्या फेऱ्यापेक्षा कमी फेऱ्या मारून तसेच कमी क्षमतेच्या टँकरने (खेपा) पाणीपुरवठा केला जात असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला नाही तर आणखी किमान 15 दिवस तरी नागरीकांचे पाण्यावाचून हाल होणार असल्याचे चित्र आहे.