नांदेड - डॉक्टर हा रुग्णासाठी देवदूतासारखा असतो. गंभीर परीस्थिती असलेल्या रुग्णाला मृत्यूच्या बाहेर काढण्यासाठी डॉक्टर पूरेपूर प्रयत्न करीत असतात. पण सध्या डॉक्टरांवर होत असलेल्या हल्याने अनेक डॉक्टरांचे मनोबल खचले आहे. लाखात एखाद्याला होणाऱ्या आजाराशी लढणाऱ्या रुग्णाला, दोन हात करत डॉक्टर रमेश नारलावार यांनी मृत्यूच्या दारातून परत आणून जीवनदान दिले. यासोबतच डॉक्टर आणि रुग्णाचे एक वेगळे नाते कायम असल्याचा संदेशही त्यांनी दिला. राम कदम असे मृत्यूच्या तोंडातून परत आलेल्या या रुग्णाचे नाव आहे.
राम कदम अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील रहिवासी आहेत. त्यांना अचानक फुफ्फुसाचा त्रास सुरू झाला. फुफ्फुसाची रक्तवाहिनी बंद पडली होती. असा दुर्धर आजार लाखो रुग्णामधे एखाद्याला होत असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या अवस्थेत कदम यांना कर्मवीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
तब्येत खालावल्याने कदम हे अत्यवस्थेत गेले. त्यामुळे कदम यांचे प्राण वाचतील की नाही याची शाश्वती नव्हती. डॉ. रमेश नारलावर यांच्या मनात देखील कदम यांना अॅडमिट करून घ्यावं की नाही असे वाटत होते. सध्या डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे डॉ. नारलावर यांच्या मनातही काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण नारलावर यांनी विचार करून कदम यांच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली आणि कदम यांचे प्राण वाचले.
सध्या अनेक ठिकाणी डॉक्टरांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डॉक्टर हा समाजातील एक भाग आहे. समाजाने डॉक्टरांना समजून घेण्याची गरज असल्याचे मत डॉ.रमेश नारलावर आणि डॉ कर्मवीर यांनी व्यक्त केले.