नांदेड - जिल्ह्यातून पंजाबला परतलेल्या शीख भाविकांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाल्याने पंजाब सरकाकडून प्रशासनावर आरोप सुरू आहेत. कुठलीही तपासणी न करता नांदेडहून या भाविकांना पाठवण्यात आल्याने पंजाब सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नांदेडला भेट दिली.
प्रशासनाची बैठक घेतल्यानंतर लंगरसाहीब आणि एनआरआय भवन येथे जाऊन विभागीय आयुक्तांनी आढावा घेतला. अजूनही हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली येथील जवळपास दीडशे भाविक लंगरसाहिबमध्ये आहेत. याशिवाय लंगरसाहिबचे दीडशे कामगारही तिथेच आहेत. त्यांना एनआरआय भवनमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी माहिती घेतली. पंजाबमध्ये भाविक पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नांदेडमध्ये प्रशासनाने सरसकट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यात गुरुद्वाराचे 20 सेवादार पॉझिटिव्ह निघाले होते. यातील 4 पॉझिटिव्ह रुग्ण अजूनही फरार आहेत त्यांचा शोध सुरू आहे.
भाविकांना कोरोनाची लागण कुठून झाली, याबाबत नांदेड प्रशासनाने कुठलाही खुलासा किंवा प्रतिक्रिया दिली नाही. याबाबत विभागीय आयुक्त केंद्रेकर यांना विचारले असता त्यांनीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्याचे टाळले. लागण नेमकी कुठून झाली हे महत्त्वाचे नसून लागण झालेले सर्व भारतीयच आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत, असे म्हणून त्यांनी वेळ मारून नेली. दरम्यान, येत्या काळात 3 हजार रुग्णांवर उपचार करण्याची तयारी असली पाहिजे, अशा सूचना प्रत्येक जिल्ह्याला दिल्याचे केंद्रेकर म्हणाले.