नांदेड - नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी विद्यापीठ युवकांचा एक सहाय्य गट दरवर्षी तयार करण्यात येतो. यासाठी २००७ पासून महामाहीम राज्यपालांकडून ‘आव्हान-चान्सलर्स ब्रिगेड: राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर’ राबविण्यात येते. संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्र राज्यातच हा उपक्रम चालविला जातो. २०१३ मध्ये या शिबिराचे यशस्वी आयोजन केल्यामुळे २०१९ मध्ये पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्याचा मान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास मिळाला आहे.
दहा दिवस चालणाऱ्या या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सोमवार, दि. ३ जून २०१९ रोजी सकाळी १० वाजता राज्याचे महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती चे. विद्यासागर राव यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे राहणार असून सन्माननीय उपस्थितीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना कक्ष, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई येथील राज्य संपर्क अधिकारी व विशेष कार्य अधिकारी डॉ. अतुल साळुंके हे राहणार आहेत. ३ ते १२ जून २०१९ या दरम्यान ‘आव्हान-चान्सलर्स ब्रिगेड: राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर’ विद्यापीठ परिसरात आयोजित करण्यात आले आहे.
सभागृहामध्ये पुनरुज्जीवन (बाळ, प्रोढ), श्वासावरोध (बाळ, प्रोढ), रक्तस्त्राव, बँडेज किंवा पट्ट्या, अस्थिभंग बाजूचा, अस्थिभंग (उपबाजूचा), मांडीचा अस्थिभंग, मानेच्या मणक्याचा अस्थिभंग, रिकव्हरी पोझीशन, झटके (अपस्मार) प्रोढ, मर्माघात (शॉक), उष्माघात, विजेचा धक्का, नाकातील रक्तस्त्राव, डोळ्यातील आगंतुक वस्तू, डोळ्यात रासायनिक द्रव्य गेल्यास, श्वानदंश, प्रथमोपचार पेटी, गाठींचे विविध प्रकार, रुग्ण वाहतूक पद्धती आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अग्नी आपत्त्तीचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या खेळाच्या मैदानावर देण्यात येणार आहे. यामध्ये आगीपासून बचाव, आग लागू नये म्हणून घ्यावयाची काळजी, एक्स्टिंग्युशर सिलेंडर वापरावयाची पद्धत आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जल आपत्तीचे प्रशिक्षण डॉ. शंकरराव चव्हाण जलाशयात पूर व बचावकार्य आदी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इमारतीमधील आपत्तीचे प्रशिक्षण ज्ञान स्त्रोत केंद्राच्या इमारतीत देण्यात येणार आहे. आव्हान-२०१९ या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिरामध्ये स्वंयसेवकांना बोअरवेलच्या आपत्ती विषयीचे सविस्तर विद्यापीठ परिसरातील बोअरवेल जवळ मार्गदर्शन करून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात असून ‘आव्हान-२०१९’चे समन्वयक डॉ. अविनाश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे. यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वयंसेवकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आर.एम.मुलानी, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, आणि ‘आव्हान-२०१९’चे समन्वयक डॉ. अविनाश कदम यांनी केले आहे.