नांदेड - लोकसभा निवडणुकीत भाजप म्हणत होती मोदी है तो मुमकीन है. पण यांनी सगळा बट्ट्याबोळ केला. आता विधानसभा निवडणुकीत हे म्हणतील फडणवीस है तो मुमकीन है. पण तुम्ही यांच्या शब्दांना बळी पडू नका असे म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार निशाणा लगावला.
राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेचे नांदेड जिल्ह्यात आगमन झाले. त्यावेळी आयोजीत प्रचारसभेत धनंजय मुंडे बोलत होते. इकडे सरकार शेतकऱ्यांना त्रास देतंय आणि तिकडे पिकविमा कंपन्या गब्बर होत आहेत.
जिथं सोयाबीन पिक लावले तिथं या पिकविमा कंपन्या सोयाबीन पीकच विम्यातून वगळते. कापूस लावला तर कापूस वगळते. सरकार यावर काहीच बोलत नसल्याचे मुंडे म्हणाले.
मुख्यमंत्री शेतकऱ्यांना विसरले
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना असंख्य आश्वासने दिली. मात्र, निवडणूक जिंकून आल्यानंतर हे शेतकऱ्यांना विसरले. मुख्यमंत्री जरी माझ्या शेतकऱ्यांना विसरले असेल तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीच विसरू शकत नाही. म्हणून आजही आम्ही सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात आवाज उठवत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.