नांदेड - शिवसेनेशी संविधानाप्रमाणे सरकार चालविण्याच्या अटीवर आघाडी केल्याचे वक्तव्य बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. या त्यांच्या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, यापूर्वी शिवसेना संविधानाप्रमाणे चालत नव्हती का? असा टोला त्यांनी लगावला. हे तीन चाकी रिक्षा असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार लांबचा पल्ला गाठू शकणार नाही असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
प्रजासत्ताक दिनी अशोक चव्हाण म्हणाले होते की, आम्ही संविधानाप्रमाणे सरकार चालवू, असे शिवसेनेकडून लिहून घेतले आहे. म्हणजे यापूर्वी शिवसेना संविधानाप्रमाणे काम करत नव्हती का? असा प्रश्न फडणवीस यांनी केला. तर उद्धव ठाकरे हे सोनिया गांधीकडे पत्र घेऊन गेले होते का? हे विचारणे गरजेचे असेल्याचे फडणवीस म्हणाले.
अशोक चव्हाणांचा आनंद फार काळ टीकणार नाही
तीन चाकी रिक्षा असलेले महाविकास आघाडीचे सरकार आहे. हे सरकार लांबचा पल्ला गाठू शकणार नाही. आमचे सरकार हे मोठे इंजिन असणारे मोदी सरकार आहे. राज्य सरकार हे मल्टि स्टारर सरकार नसून हॉरर सरकार असल्याचे फडणवीस म्हणाले. अशोक चव्हाण आम्हाला मनातून धन्यवाद देत असतील, कारण आमच्यामुळे ते मंत्री झाले. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकेल असे वाटत नाही. कारण हे सरकार टिकेल असे वाटत नाही.
महाविकास आघाडीने दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. शिवभोजन थाळीमध्ये केवळ ५०० लोकांना जेवण मिळणार आहे. त्यापेक्षा गुरुद्वारातील लंगरमधील आमचे जेवण चांगले असून, सर्वांना मोफत सेवा देत आहे. केवळ हे सरकार गरीबांना फसवण्याचे काम करत असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सीएए आणि एनआरसीवरून हे सरकार धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. सीएए हे नागरीकत्व घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी आहे. हे पहिल्यांदा समजून घेणे गरजेचे आहे. शाहीनबाग येथील आंदोलनात सामील होऊन देशविरोधी लोकांसोबत हे कॉंग्रेस- राष्ट्रवादीवाले मांडिला मांडी लावून बसत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, आमदार भीमराव केराम, आमदार राजेश पवार, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, शहराध्यक्ष प्रविण साले आदी उपस्थित होते.