नांदेड - सध्या कोरोना व्हायरस महामारीने हाहाकार माजवला असल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे दारूची दुकाने बंद असल्यामुळे सर्वत्र हातभट्टीचा धंदा जोमाने सुरू आहे. रावधानोरा तांडा येथे अवैध हातभट्टी दारू काढून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती सुनील पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी धर्माबाद यांना मिळाल्यानंतर त्यांनी दोन ठिकाणी छापा टाकून ६० हजार रुपये किमतीची ६०० लिटर हातभट्टी दारु जप्त करुन दोघांना ताब्यात घेतले आहे.
उमरी तालुक्यातील धानोरा तांडा येथील रमेश शामराव चव्हाण यांच्या शेतात छापा टाकून ४०० लिटर हातभट्टी किमत ४०,००० हजार व गोविंद हरी चव्हाण (रा. धानोरा तांडा, वाघाळा शिवार) येथे छापा टाकून २०० लिटर दारू २०,००० हजार किमतीचा माल मिळून आला. अशा दोन ठिकाणी धाड टाकून ६० हजाराची ६०० लिटर हातभट्टी दारु जप्त करुन रमेश शामराव चव्हाण व गोविंद हरी चव्हाण या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
उमरी पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील हे आधिक तपास करीत आहे.