नांदेड - संपूर्ण जगाला कोरोना संसर्गाने ग्रासले असताना भारतीय विवाह संस्कृतीला हा विषाणू धक्का लावू शकला नाही. सोशल डिस्टन्सची लक्ष्मण रेषा पाळत काढलेला मुहुर्त, ठरलेली वेळ, यानुसार ही कन्यादान करता येते, हे नांदेड जिल्ह्यातील खानापूर गावातील एका लग्नाच्या गोष्टीवरुन दिसून आले. गरजूंना मदत करण्याचा निर्धार करुन या लग्नात कन्यादान करण्यात आले.
जल्लोषात लग्न करता येणार नसल्याने काही काळ हिरमोडही झाला. लग्नावर होणारा खर्च टाळल्याने त्यातून बचत झालेल्या रकमेतून गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेत इंगळे व हिवराळे परिवाराने सामाजिकतेचे भान जपले. कोरोनाच्या सावटाखालील लग्नाच्या निमित्ताने कोरोना विरोधी लढण्याचा निर्धारही केला या परिवाराने केला आहे. खानापूर ग्राम पंचायतीचे सदस्य माधव इंगळे यांची एकुलती एक कन्या पूजाचा मुखेड तालुक्यातील जांभळी येथील आनंद हिवराळे यांच्या गणेश या मुलाशी कोरोनाची चाहूल जगाला लागण्यापूर्वीच ठरला होता. ठरलेल्या मुहूर्तावर सोशल डिस्टन्स पाळत अगदी पाच लोकांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पाडला गेला. जोडप्याने व त्यांच्या आई वडिलांनी लग्नाचा खर्च टाळत आपल्याकडून शक्य झाले, तेवढे गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.