नांदेड - रस्त्यावरील खड्डे बुजवण्याऐवजी हा पैसा राज्य सरकारच्या खिशात जात आहे. 1 हजार 50 कोटी रुपयांच्या एन्ट्री सापडल्या आहेत. त्यामुळे कॉम्प्युटरमध्ये हिशोब ठेवून कॉर्पोरेट पद्धतीने भ्रष्टाचार सुरू आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. यांच्याविरोधात कारवाई सुरू झाली की हे कांगावा करतात. केंद्र सरकार महाराष्ट्र विरोधी आहे असे म्हणतात. पंतप्रधान मोदी यांचे 'ना खाऊंगा... ना खाने दुगा' हे धोरण असून, भ्रष्टाचाऱ्यांना थारा देणारे नाही, असेही फडणवीस म्हणाले. ते भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ बिलोली येथील जाहीर सभेत बोलत होते.
हेही वाचा - आर्यन खान प्रकरणातील पंच किरण गोसावी पुणे पोलिसांना शरण येण्याची शक्यता
ते म्हणाले की, देशात सर्वाधिक पैसा कराच्या रूपातून महाराष्ट्राला मिळतो. पण महाविकास आघाडी सरकारची देण्याची दानत आणि नियत नाही. दोन वर्षात फुटकी कवडीसुद्धा दिली नाही. आम्हाला जातीयवादी म्हणता? आम्ही प्रत्येक जाती-धर्माला योजना दिली.
मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मृत केली -
मराठवाड्यात वॉटर ग्रीड योजना आम्ही काढली होती. राज्य सरकारने 25 हजार कोटींच्या योजनेसाठी पाच कोटी दिले. या योजनेला त्यांनी मृत स्वरूप आणले. मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाला ठेंगा दिला. राज्यपाल सांगायचे पैसा द्या. अशोकराव मुख्यमंत्री असूनही वैधानिक मंडळ बंद केले नाही, असे फडणवीस म्हणाले.
पीक विमा राज्य सरकारमुळे रखडला -
दोनवेळा अतिवृष्टी झाली. पण कुणीच भेटायला आलं नाही. शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू होते. दुःख बघितले. हेक्टरी २५ हजार ५० हजारच्या गप्पा मारणारे एक रुपया द्यायला तयार नाहीत. पाच वर्षात सातत्याने आम्ही मदत केली. पण यांनी काहीच केले नाही. दहा हजार कोटी पॅकेजची घोषणा केली. पण शेतकऱ्यांच्या पदरात पडेल तेंव्हा खरे आहे. अशी टीका फडणवीस यांनी केली. आम्ही एका-एका जिल्ह्याला 500 कोटी रुपये पीक विमा दिला. पण महाविकास आघाडी सरकारने केवळ वर्षभरात राज्यात 700 कोटी दिले. उलट केंद्रावरच टीका करणे सुरू आहे. बायकोने मारले तरी म्हणतील यात केंद्र सरकारचा हात आहे. राज्य सरकारने अजून आपला प्रीमियम भरला नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत, असा आरोप फडणवीस यांनी केला.
सरकारचं डोकं ठिकाणावर नाही -
कुठल्याही घटकाला न्याय द्यायला राज्य सरकार तयार नाही. १५ महिने अॅफिडीव्हीट सर्वोच्च न्यायालयात दाखल न केल्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण गेले आहे. 'पैसा फेको तमाशा देखो' असे धोरण काँग्रेसचे आहे. अशोकराव तुम्ही कितीही खर्च केले तरी चिखलीकर यांना निवडून दिले. कोट्यवधी रुपये लावले तरी आम्ही सर्वसामान्य माणसाशी काम करणारे आहोत. मराठवाड्याचा आवाज म्हणून सुभाष साबणे यांनी काम केले आहे. या सरकारचं डोकं ठिकाणावर नाही, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भागवत खुबा, माजी मंत्री बबनराव लोणीकर, राम शिंदे, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, आमदार तुषार राठोड आदीं उपस्थित होते.
हेही वाचा - VIDEO : समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करणारे वकील कनिष्ठ जयंत यांच्याशी खास मुलाखात