नांदेड - जिल्ह्याती महानगरपालिका, नगर परिषद व नगर पंचायतच्या पोटनिवडणुकीत ६ पैकी ५ जागा जिंकून सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपला भोपळाही फोडता आलेला नसून, एका ठिकाणी अपक्ष उमेदवार निसटत्या मताधिक्क्याने विजयी झाला. काँग्रेसच्या या घवघवीत यशाने नांदेड जिल्ह्यात महाविकास आघाडी अधिक मजबूत झाली आहे.
हेही वाचा - जिल्हा परिषदेत चारही सभापती काँग्रेसचेच; राष्ट्रवादीच्या हाती भोपळा....!
या पोटनिवडणुकीत नांदेड वाघाळा महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. ११ (ड) मध्ये काँग्रेसचे अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार १ हजार ८६६ मतांनी, धर्माबाद नगर परिषदेच्या वार्ड क्र. २ (अ) मध्ये काँग्रेसच्या कविता नारायण बोलमवाड २२९ मतांनी तर व़ार्ड क्र. ४ (अ) मधून काँग्रेसचेच सायारेड्डी पोशट्टी गंगाधरोड ४६६ मतांनी, हिमायतनगर नगर परिषदेच्या वार्ड क्र. १३ मधून काँग्रेसच्या अजगरी बेगम अ. रहेमान ३४१ मतांनी, नायगाव नगर पंचायतच्या वार्ड क्र. १ मध्ये काँग्रेसचे बोईनवाड हणमंत आनंदराव २०७ मतांनी विजयी झाले असून, बिलोली नगर परिषदेच्या वार्ड क्र. ५ (अ) मध्ये काँग्रेसचे उमेदवार लक्ष्मण शंकरराव शेट्टीवार यांना केवळ ७० मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले असून, मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचेही ट्विट करून आभार व्यक्त केले आहेत.
हेही वाचा - 'खासदार चिखलीकर माफी मागा, अन्यथा...'