नांदेड - आगामी विधानसभा निवडणुकीची लढाई मोठी असली तरी ती जिंकायचीच आहे. यासाठी ध्येयाने कामाला लागा. जास्तीत जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून येतील यासाठी काम करा. असे आवाहन माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केले आहे. नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने आगामी विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी ते बोलत होते.
पक्ष जो उमेदवार देईल त्यांच्यासोबत सर्व इच्छुकांनी राहावे - चव्हाण
नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी व शनिवारी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी ध्येयाने कामाला लागा असे आव्हान केले. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा व धर्मनिरपेक्ष विचारांवर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. या पक्षात इच्छुकांची संख्या जरी मोठी असली तरी पक्ष जो उमेदवार देईल त्यांच्यासोबत सर्व इच्छुकांनी राहावे, असे चव्हाण यावेळी म्हणाले.
काँग्रेस इच्छुकांनी समर्थकांसह हजेरी लावत जोरदार शक्तिप्रदर्शन केले
नांदेडमध्ये शुक्रवार व शनिवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाकती पार पडल्या. इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह हजेरी लावत मोठे शक्तिप्रदर्शन केले. यावेळी नांदेड दक्षिण मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त होती. हदगावमध्ये इच्छुक तीनही उमेदवारांनी सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन केले. शनिवारी नांदेड उत्तर, भोकर, किनवट, नायगाव व लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. इच्छुकांच्या समर्थकांची संख्या लक्षात घेऊन प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात मुलाखतीसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती.