नांदेड - पॉलीटेक्नीक कॉलेजमधील स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशिनच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त लावला आहे. त्याबरोबर काँग्रेसचे कार्यकर्तेही स्ट्राँगरूम परिसरात तंबू लावून ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेसाठी पहारा देणार आहेत. यापूर्वी २००९ मध्ये भाजपचे संभाजी पवार यांनीही तंबू लावून पहारा दिला होता.
सोमवारी सायंकाळी प्रशासनातील अधिकारी व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्ट्राँगरुमच्या ठिकाणी जाऊन जागेची पाहणी केली. लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशिनमध्ये बंद झाले आहे. मतमोजणी महिनाभरानंतर असल्याने पॉलीटेक्नीक कॉलेजमधील स्ट्राँगरुममध्ये सर्व ईव्हीएम मशिन सुरक्षित ठेवण्यात येणार आहेत. ईव्हीएम मशिनच्या सुरक्षेसाठी स्ट्राँगरुमच्या चारही बाजुला टिनपत्र्यांची भिंत उभारण्यात आली आहे. येथे बाहेर स्थानिक पोलीस, त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलाचे जवान व आत केंद्रीय राखीव दलाचे जवान २४ तास तैनात असणार आहेत.
या ठिकाणी येण्यास कोणालाही परवानगी नाही. हा संपूर्ण परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तरीही काँग्रेसने तंबू उभारण्याची मागणी केल्यामुळे काँग्रेसला नेमकी कोणाची भीती आहे? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. २००९ मध्येही लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार संभाजी पवार यांनीही स्ट्राँगरूमबाहेर तंबू लावला होता. अनेक दिवस त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पहारा देत होते. २००९ निवडणूकीत भाजपचा पराभव झाला होता.