हिंगोली - संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहत आहेत. सध्या नामनिर्देशन पत्र भरण्याची धामधूम सुरू असून, येत्या काही दिवसात प्रचाराला सुरुवात होणार आहे. समाज माध्यमांवर पक्षीय प्रचाराने धुमाकूळ घातला असून आता 'चौकीदार चोर है', या रिंगटोन लावलेल्या मोबाईल धारकांचे प्रमाण वाढले आहे. जेथे कुठे निवडणुकीची चर्चा असते, तिथे हळूच कोणीतरी ही रिंगटोन सुरू करतोय. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप कार्यकर्त्ये उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी सज्ज झालेले असताना, निवडणुकीच्या तोंडावर 'चौकीदार चोर है' ची ही रिंगटोन चांगलीच व्हायरल झाली आहे. अनेक मोबाईलधारक ही रिंगटोन वाजवत असल्याने, याची चर्चा जोरात रंगत आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघात समाज माध्यमांवर अनेक नेत्यांचे ग्रुप तयार झाले आहेत. निवडणुकीच्या या ग्रुपमध्ये ही रिंगटोन व्हायरल केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी रिंगटोन वाजविल्याने भाजप कार्यकर्त्यांचा पारा वाढत असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झालेली नसताना या रिंगटोनमुळे एक प्रकारचा प्रचारच होतोय हे विशेष!