नांदेड - भोकर तालुक्यातील चिंचाळा गावातील आई-वडील नसलेल्या अनाथ मुलीचे लग्न गावाने लावून दिले आहे. या मुलीचे आई-वडील तिच्या लहानपणीच वारल्याने तिच्या आत्या व मामाने तिचा सांभाळ केला होता. ज्योती बालाजी पांचाळ असे गावाने लग्न लावून दिलेल्या नववधूचे नाव आहे. चिंचाळा गावातील या लेकीच्या लग्नाने जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे.
ज्यातीचा नांदेड येथील रहिवासी असलेले माधवराव पांचाळ यांचा मुलगा सोनू उर्फ शिवकुमार याच्याबरोबर विवाह लावून दिला. या लग्नाची सर्व तयारी संपूर्ण गावाने मिळून केली. आपलीच लेक मग कमतरता कशाला, असा भाव मनात आणून प्रत्येकाने या लग्नासाठी आपला वाटा उचलला आहे. या लग्नासाठी सरपंच विठ्ठलराव नारमाड, सामाजिक कार्यकर्ते गंगाधर सुर्यवंशी, चंपतराव ढवळे, गंगाधर कदम, इरन्ना आन्नावार, बालाजी मोरे, संतोष महाराज यांनी पुढाकार घेतला आहे. तर प्रा डॉ व्यंकट माने, व्यकंट ढवळे, शासकीय गुत्तेदार चंद्रकांत चिंचाळकर, माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर यांनी सहकार्य केले आहे.