नांदेड - मागील काही महिन्यांपासून राज्यभर गाजत असलेल्या धान्य घोटाळ्यात दोन वाहतूक पुरवठाधारकांसह एका उद्योजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या घोटाळ्याची तार आता जिल्हा पुरवठा विभागापर्यंत पोहचली असून या विभागातील ४ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या गोदामातून निघालेले धान्य तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर या दोन्हीकडच्या नोंदीत तफावत आढळून आली. त्यामुळे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने पुरवठा विभागातील चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अव्वल कारकून रमेश भोसले, रत्नाकर नारायण ठाकूर, गोदामपाल इस्माजी नागोराव विप्तल व हदगाव गोदामपाल विजय मारोतराव शिंदे यांचा समावेश आहे.
नांदेड जिल्ह्यातील धान्य घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे गेल्यानंतर मागील महिन्यात नांदेड व लातूर येथील उद्योजकासह व्यवस्थापकास अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. अटक करण्यात आलेले चार जण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. असे असले तरी सीआयडीच्या तपासणीत आणखी कोणकोणते मासे जाळ्यात अडकतात याची चर्चा होत होती. दरम्यान, या प्रकरणात पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या दोन अव्वल कारकुनासह अन्य दोन गोदामपालाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
रमेश भोसले आणि रत्नाकर ठाकूर या अव्वल कारकुनाकडे जिल्ह्यातील अन्नधान्य पुरवठा करण्याबरोबर पाठविलेल्या धान्याची नोंदी ठेवण्याची जबाबदारी होती. तर इस्माजी विप्तल, विजय शिंदे या गोदामपालाकडे तालुक्याची जबाबदारी होती. जिल्ह्याचा माल तालुक्याला पाठविल्यानंतर दोघांनाही नोंदी ठेवणे आवश्यक होते. किती धान्य आले, कधी आले, कोणकोणत्या ट्रकने आले याचबरोबर आलेले धान्य कुठे वितरीत केले याचा हिशोब त्यांच्याकडे होता.
माल आला की नाही किंवा नाही आला तर का आला नाही याचीही नोंद घेणे आवश्यक होते. परंतु सीआयडीच्या तपासात मोठी तफावत येत असल्याचे आढळून आल्यानंतर पुरवठा लेखाविभागाच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाईचा फास आवळला गेला. दरम्यान, चौकशीमध्ये समाधानकारक उत्तरे ते देऊ शकले नाहीत.
चौकशीत अन्नधान्य पुरवठ्याच्या बाबतीत आढळून आलेली तफावत पाहता गुन्हा नोंदवून त्या चार कर्मचाऱ्यांना अटक केल्याचे सांगितले जात आहे. सदरची कारवाई सीआयडीच्या पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गुजर तपासणीक अधिकारी पोलीस उपअधीक्षक आय.एम. पठाण यांच्यासह आर. एम. स्वामी, आर. आर. सांगळे, ए.जी. पांडे, मिर्झा, सीआयडीचे फौजदार कचेवाड आदींनी केली.