नांदेड - येथे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी संयोजन समितीतील २१ कार्यकर्त्यांविरुद्ध जमावबंदी उल्लंघन आणि कोविड नियमांचे पालन न करणे यासह विविध कलमांखाली वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेडमध्ये केले होते मूक आंदोलन
नांदेडमध्ये सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे व विविध मागण्यांसाठी नांदेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केले होते.
२१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
याप्रकरणी मराठा समाजाच्या आरक्षणसाठी मराठा मुक मोर्चाचे आयोजन करुन जनसमुदाय जमवून जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी लागू केलेली होती. तसेच, आंदोलनाची परवानगी घेतली नव्हती. दरम्यान, हे आंदोलन कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे होते. असे लक्षात घेत सुमारे 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश शंकरराव खाडे यांच्या फिर्यादीवरून 1 स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, सदा पुय्यड पाटील, निरंजन कदम पाटील, सुनिल कदम पाटील, नवनाथ जोगदंड पाटील, वैभव भिसीकर, राजेश मोरे, शिवाजी हंबर्डे, जाधव एन.टी., महेश शामराव जाधव, सुरेश लोट, तिरुपती भगनुरे पाटील, बाला कदम पाटील, सुभाष कोल्हे, सोपान नेव्हल पाटील, तानाजी नेव्हल पाटील, गिरीश जाधव, धनंजय सुर्यवंशी, शुभम घोरबांड, सुनिल तेलंग, विजय कदम सर्व रा.नांदेड यांच्याविरुद्ध वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.