नांदेड - सिडको भागातील गोविंद गार्डन परिसरात एका तरुण व्यापाऱ्याला मारहाण करून लुटल्याची घटना समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हडको भागात राहणारे व्यापारी शुभम दिलीप जोशी (वय- 25) यांना रात्री 11 च्या समारास काही तरुणांनी धाक दाखवून गोविंद गार्डनच्या मागे नेले. तेथे त्यांना रॉडने मारहाण करण्यात आली, त्यामुळे डोके फुटले. तसेच 2 दातही पाडले. यावेळी आरोपींना त्यांच्या हातातील सोन्याच्या 3 अंगठ्या, चांदीची 1 अंगठी, गळयातील सोनसाखळी, हातातील चांदीचे कडे असा ऐवज लुटला आहे.
दरम्यान, शुभम जोशी यांनी दिलेल्या तक्रावरून राहुल नीळकंठ, बंटी नवघरे, अमोल बोरकर (रा.हडको) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.एम.घोळवे करत आहेत.