नांदेड : धुळवडीच्या दिवशी हला-मोहल्ला या कार्यक्रमात शीख तरुणांनी थेट पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी हातात तलवारी व भाले घेऊन हल्ला केल्यामुळे आठ पोलीस जखमी झाले. यात चार पोलीस गंभीर जखमी झाले. यावेळी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या दिशेने फेकलेला भाला त्यांचा अंगरक्षक दिनेश पांडेंनी पाठीवर घेतला. यामुळे प्रमोदकुमार यांचे प्राण वाचले.
मिरवणुकीला नाकारली होती परवानगी
दरवर्षी धुळवडीच्या दिवशी नांदेड मधील सचखंड गुरुद्वारा येथून हल्लाबोल मिरवणूक काढण्यात येते. परंतु, यंदा लॉकडाऊनमुळे प्रशासनाने मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. त्यानंतरही २९ मार्च राेजी सायंकाळी गुरुद्वारात अरदास झाल्यानंतर बॅरीकेट तोडून मिरवणूक मुख्य रस्त्यावर आली. यावेळी हातात शस्त्रे घेवून चारशे ते पाचशे तरुणांचा जत्था पोलिसांच्या दिशेने धावत होता. दिसेल त्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या दिशेने तलवारी घेऊन मिरवणुकीतील लोक धावत होते.
हिंसेवेळी पांडे करत होते अंगरक्षण
या हिंसेवेळी प्रवेशद्वार क्रमांक एक येथे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, त्यांचा अंगरक्षक दिनेश रामेश्वर पांडे आणि पो. नि. द्वारकादास चिखलीकर हे थांबून होते. त्याचवेळी पोलिस अधीक्षक शेवाळे आणि चिखलीकर हे जमावापासून बाजूला होत होते. त्यावेळी अंगरक्षक पांडे हे त्यांना जमावापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत त्यांना कव्हर करीत होते. यावेळी जमावातील एकाने पोलिस अधीक्षकांच्या दिशेने भाला फेकला. क्षणातच तो भाला पांडे यांच्या पाठीत घुसला. मोठ्या पात्याचा भाला पांडे यांच्या बरगडीपर्यंत पोहोचला. यामुळे रक्तबंबाळ झाल्याने पांडे जमीनीवर कोसळले. लगेच सहकारी पोलिसांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या पाठीवर तब्बल पन्नास टाके पडले. यामुळे दोन दिवस ते शुद्धीवर नव्हते. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले आहे.
पांडे कुटुंबाला खाकीचे आकर्षण
दिनेश पांडे यांचे वडील रामेश्वर पांडे हे निवृत्त पोलिस उपनिरिक्षक आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच दिनेश यांना खाकीचे आकर्षण होते. मोठे झाल्यावर त्यांनीही अंगावर खाकीच चढविली. सध्या ते पोलिस दलात नाईक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या कर्तव्य निष्ठेमुळेच पोलिस अधीक्षकांनी त्यांची अंगरक्षक म्हणून नेमणूक केली.
खासगी रुग्णालयात उपचार
नांदेडमध्ये बेकायदा हल्ला-मोहल्ला मिरवणुकीवेळी जमावाने पोलिसांवर हल्ला केला. यात पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांचे अंगरक्षक दिनेश पांडे, कर्मचारी अजय यादव यांच्यासह पाच कर्मचारी गंभीर जखमी झाले. या कर्मचाऱ्यांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी हल्ला कसा झाला? या बाबत जखमी पोलीस कर्मचारी अजय यादव यांनी माहिती दिली.
हेही वाचा - मनसे पदाधिकारी जमील शेख हत्याकांडातील आरोपी लखनऊमधून जेरबंद; नेत्याने सुपारी दिल्याची कबुली
हेही वाचा - अक्षय कुमारला कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती