नांदेड - अर्धापूर तालुक्यातील पार्डी ते अर्धापूर राष्ट्रीय महामार्गावरील एका ढाब्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धुडगुस घातल्याची घटना समोर आली आहे. त्यांनी येथील नोकरासह एकाला मारहाण करुन जखमी केले आहे. तसेच ढाब्यावरील सामानाची तोडफोड करुन 80 हजाराचे नुकसान केले आहे. हा प्रकार सोमवारी रात्री घडला. या प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांसह इतर 16 आरोपी विरोधात अर्धापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस अमोल कपाटे, तालुका सरचिटणीस प्रभू कपाटे हे सोमवारी दुपारी आपल्या मित्रांसह अर्धापुर-वारंगा रस्त्यावरील शेनी फाट्याजवळ 'श्रीअंबे' ढाब्यावर जेवण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी सोबत आणलेली दारु पिऊन जेवण केले. त्यानंतर बिल देताना जेवणाचे बिल जास्त झाले म्हणून धाबा व्यवस्थापकासोबत शिवीगाळ केली. त्यानंतर परत रात्री 7 ते 8 मोटरसायकलवर 15 ते 16 जण हातात काठ्या, दांडके घेऊन ढाब्यावर आले आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धाब्यामधील सामानाची तोडफोड केली.
ढाब्यावरील नोकर संजय हिरालाल चव्हाण यांना दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच स्वयंपाक करणाऱ्या महिलेसह इतर नोकरांना मारहाण केली. दरम्यान, गोदावरी बँकेचे पिग्मी एजंट रमेश विरकर दैनंदिन बचत जमा घेण्यासाठी काऊंटरजवळ आले असता जमावाने त्यांनाही काठीने मारहाण केली.
या प्रकरणी ढाब्यावरील नोकर संजय हिरालाल चव्हान यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अर्धापूर पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी अमोल कपाटे, प्रभू कपाटे (दोघे रा.येळेगाव ता.अर्धापुर) कृष्णा शिंदे, गुणाजी जाधव आणि इतर 10 ते 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. यामधील सर्व आरोपी फरार आहेत.