नांदेड - कोरोनाच्या संकटकाळात महाविकास आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप करत या विरोधात भाजपच्यावतीने आज (शुक्रवार) राज्यभर 'मेरा आंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव' हे आंदोलन करण्यात येत आहे. आज हे आंदोलन नांदेड जिल्ह्यातही करण्यात आले. नांदेड भाजपचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घरातील अंगणात काळ्या फिती व पट्टी बांधून राज्य शासनाचा निषेध नोंदवला.
नांदेड जिल्ह्यातील सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व आघाड्यांचे अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, राज्य पदाधिकारी, निर्वाचीत सरपंच, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य,आजी माजी पदाधिकारी यांनी यात सहभाग नोंदवला होता.
आज (शुक्रवार) महाराष्ट्र बचाव आंदोलनाचा दुसरा टप्पा पार पडला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीचा भाजपने प्रत्येक बुथवर निषेध नोंदवला. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी किंवा घरासमोर, अंगणात, पोर्चमधे, बाल्कनीत फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळून, तोंडावर काळ्या रंगाचे मास्क किंवा पट्टी बांधून, काळे कपडे घालून निषेध नोंदवला. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो, ठाकरे सरकार होश मे आओ, असा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध मागण्याचे फलक हाती घेतले होते.
नांदेड जिल्ह्यात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, शहराध्यक्ष प्रविण साले यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग नोंदवला होता.
हेही वाचा - 'वर्दी'तील दर्दी.. नांदेडात गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी पोलिसांनी दिली स्वतःची गाडी
हेही वाचा - नांदेडच्या ग्रामीण भागातील 3 कोरोनाबाधित जिल्ह्याबाहेरुन आलेले; मुंबई, हैदराबाद येथून परतलेले