नांदेड- जिल्ह्यातील भोकर मतदारसंघ हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम भाजपने केले आहे. लोकसभेची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपची व्यूहरचना सुरू असून त्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. लोकसभा निवडणुकीत नाराजीचा मोठा फटका बसल्याने ते पूर्णवेळ मतदारसंघात थांबून आहेत. मतदार आणि कार्यकर्त्यांशी चव्हाण व्यक्तीशः संपर्कात आहेत.
दिवंगत शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख आहे. २००९ साली झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एक लाख 20 हजारांपेक्षा जास्त मतं घेत विजय मिळवला होता. त्यानंतर २०१४ साली अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमीता चव्हाण इथुन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, यावेळेस त्यांचे मताधीक्य 20 हजारांनी घटले होते. या दरम्यान, अशोक चव्हाण नांदेडचे खासदार होते. पण या काळात अपेक्षीत विकासकामे झाली नाहीत. याचा काँग्रेसला चांगलाच फटका बसला आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला.
भोकरमध्ये यावेळी काँग्रेसकडुन अशोक चव्हाण स्वत: उमेदवार असणार आहेत. त्यामुळे सध्या ते पुर्णवेळ मतदारांच्या गाठी भेटी घेण्यात व्यस्त आहेत. मतदारसंघात सोशल इंजिनियरिंगच्या माध्यमातून सर्व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ते करत आहेत. त्यांना भोकरमध्येच गुंतवून ठेवण्यासाठी भाजपाने मोठी खेळी खेळलीय. भोकर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांश पुढाऱ्यांनी पक्षाला रामराम करत खासदार प्रताप पाटील यांची गळाभेट घेतली आहे. भाजपकडुन राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर निवडणुक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. बापुसाहेब गोरठेकर यांना अनेक जनाधार असलेल्या नेत्यांचे पाठबळ मिळत आहे. भोकर, अर्धापूर आणि मुदखेडमधील अनेक काँग्रेस कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. खासदार प्रताप पाटील चिखलीकर देखील स्वत: भोकरच्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे ही लढाई अशोक चव्हाण यांच्यासाठी सोपी नाही.
भाजपतील बापुसाहेब गोरठेकर, निलेश देशमुख, नागनाथ घिसेवाड, सुरेश राठोड, प्रविण गायकवाड, राम चौधरी आदी नेते निवडणुक लढवण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत धुसफूसही सुरू आहे. भाजपलाही कार्यकर्त्यांची चांगलीच मनधरणी करावी लागणार आहे. अन्यथा या जुन्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा मोठा फटका भाजपला बसू शकतो. शिवसेनेकडुन प्रल्हाद इंगोले, उत्तम जाधव, धनराज पवार, बबन बारसे यांनीही उमेदवारी मागितली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडुन नामदेव आयलवाड, केशव मुद्देवाड उत्सुक आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीची विधानसभेत पुनरावृती होईल, अशी आशा भाजपाला आहे. तर साखर कारखान्याच्या बळावर आणि वैयक्तीक अशोक चव्हाण यांच्याप्रती असलेल्या नागरिकांच्या प्रेमावर काँग्रेसची भिस्त अवंलबून आहे.