नांदेड - टाळेबंदीच्या काळात संपूर्ण व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांकडे भरमसाठ वीज बिले पाठवली आहेत. वीज वितरण कंपनीच्या या धोरणामुळे जनतेमध्ये नाराजी असून वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी नांदेड भाजपच्या वतीने महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली आज (गुरुवार) वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात आली. तसेच राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन केले गेले.
आंदोलनात केवळ भाजप पदाधिकारीच नव्हे, तर भरमसाठ बिल आल्याने हैराण झालेल्या जनतेने देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तीन महिने टाळेबंदी होती. त्यामुळे संपूर्ण व्यवहार बंद होते. असे असतानाही वीज वितरण कंपनीने एप्रिल ते जून या महिन्यात तीस ते चाळीस हजारांच्या आसपास एकत्रित बिल दिले आहे. कुठलीही सरासरी गृहीत न धरता अंदाजे हजारो रुपयांचा भुर्दंड जनतेच्या माथी मारला असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे.
हेही वाचा... जगातील सर्वात स्वस्त कोरोना लसीचे उत्पादन करण्याचे भारत बायोटेकचे लक्ष्य
राज्य सरकारमधील मंत्र्यांनी तर आधी वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. तसेच नंतर 100 युनिटपर्यंत माफी देण्यात येईल, असेही सांगितले होते. परंतु, घोषणेची अंमलबजावणी न करता उलट 30 ते 40 हजार रुपयांचे बिल आकारण्यात आले आहे. टाळेबंदीच्या काळात सहकार्य करणाऱ्या जनतेलाच धोका देण्याचे काम राज्य सरकार व वितरण कंपनीने केले आहे. त्यामुळे तातडीने वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजप महानगरच्या वतीने भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्या नेतृत्वाखाली वीज बिलाची होळी करण्यात आली. राज्य सरकार व वीज वितरण कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात युवा मोर्चा प्रदेश प्रभारी संजय कौडगे, वैद्यकीय आघाडीचे डॉ.अजित गोपछडे, सरचिटणीस विजय गंभीरे, अशोक पाटील, व्यंकटराव मोकले, उपाध्यक्ष प्रभू कपाटे, सुशील चव्हाण, राजेंद्रसिंग पुजारी, शीतल खंडील आदींसह अनेकांची उपस्थिती होती. या आंदोलनात भरमसाठ वीज बिल आलेल्या ग्राहकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून वीज वितरण कंपनीचा निषेध केला.