नांदेड - लॉकडाऊन व संचारबंदी काळातील अडचणीत आलेले व्यापारी, मजूरदार व शेतकरी यांचे 1 मार्च ते 31 डिसेंबर 2020 पर्यंतचे संपूर्ण वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात वीज वितरणच्या कार्यालयासमोर भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
व्यापारी व शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत
कोरोना, संचारबंदी व लॉकडाऊन काळात व्यापाऱ्याने दुकाने बंद असल्यामुळे व तसेच शेती माल खरेदी करण्यासाठी कोणताही व्यापारी शेतकऱ्यांकडे खरेदीसाठी न गेल्यामुळे व्यापारी अडचणीत आले आहेत. मजुरदार व शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत.
सक्तीची वीज बिल वसूली थांबवावी
तसेच रोज मजुरी करणारे मजूरदार घरीच असल्याने त्यांना संचारबंदी काळातील व आजपर्यंत दि. 01 मार्च 2020 ते 31डिसेंबर 2020 पर्यंतचे वीज बिल माफ करावे. तसेच कोरोना संचारबंदीमुळे शेतकरी व्यापारी व मजूरदार यांचे आर्थिक आवक बंद असल्यामुळे वीज बिल भरणे अवघड झाले असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी महावितरण वीज वितरण कंपनीकडून सक्तीची वसूली थांबवावी गोर गरीब जनतेचे वीज पुरवठा खंडीत कट करण्यात येऊ नये अशी मागणी करत अर्धापूर येथे वीज वितरणच्या कार्यालयासमोर भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकले होते. भाजपा कार्यकर्त्यांना अटक करून सोडण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस गंगाधर जोशी, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अँड.किशोर देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, जिल्हा चिटणीस डॉ.लक्ष्मणराव इंगोले, शहराध्यक्ष विलास साबळे, सुधाकर कदम पाटील, बाबुराव हेंद्रे, बाबुराव लंगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.