नांदेड : आपण दररोज विवाहितेच्या छळाच्या बातम्या ऐकत असतो. अनेकवेळा विवाहितेला जाळून मारल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी नांदेडमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती. नायगाव तालुक्यातील शेळगाव छत्री येथील कोमल पिराजी कुंभारगावे (वय २०) ही १९ जुलै २०२१ रोजी घरात झोपली होती. तेव्हा पती पिराजी कुंभरगावे याने पहाटे ५ वाजताचे सुमारास कोमल हिस झोपेतून उठवून शिवीगाळ व मारहाण केली. नंतर शेताकडे निघून गेला. शेताकडे गेलेला पिराजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घरी परतला. ‘तू सकाळी लवकर उठत नाहीस, काम करत नाहीस' असे म्हणत घरातील रॉकेलचा डबा कोमल हिच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिले.
आगीचा भडका उडाला : काडी पेटवताच आगीचा भडका उडून त्या भडक्यात कोमल जळाली. आग लागल्याचे कळताच शेजाऱ्यांनी कोमलला उपचारासाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. नायगाव येथून पुढील उपचारासाठी नांदेड येथे दाखल केले. मात्र उपचारादरम्यान कोमलचा मृत्यू झाला. कोमलने उपचार सुरू असताना दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध कुंटुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिक्षा सुनावली : सहाय्यक पोलीस निरीक्षक मरे व पठाण यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी, पुरावे तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश दिनेश ए. कोठलीकर यांनी आरोपी पिराजी माधव कुंभरगावे रा. शेळगाव छत्री (ता. नायगाव) यास सोमवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा देखील सुनावली आहे.
घटनेची माहिती : किरकोळ कारणाहून पत्नीला पेटवून जीवे मारणाऱ्या पतीला जन्मठेप व पाच हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. घटनेची माहिती अशी की, आरोपी पिराजी माधव कुंभरगावे वय २७ रा. शेळगाव (छत्री) ता. नायगाव बाजार याचे लग्न कोमल व्यंकट पटणे (वय २० रा. विरभद्र गल्ली जळकोट जि. लातुर) हिच्यासोबत २१ फेब्रुवारी २०१८ रोजी झाले होते. दिड वर्षाच्या आतच कोमलचा छळ सुरू झाला. १९ जुलै २०२१ रोजी कोमलला पेटवून दिल्याची घटना घडली.