नांदेड (कंधार) - संपुर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व राज्य सरकारने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या गोर-गरीब कष्टकरी लोकांचे हाल होत आहेत. या गरजू लोकांना भोसीकर कुटुंबीयांच्या वतीने तांदूळ व डाळींचे वाटप करण्यात आले
सध्या थैमान घातलेल्या कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे अनेक मजदूर, कष्टकरी, गोर-गरीब व पोटाची खळगी भरणाऱ्या सामान्य जनतेची बेहाल होत आहेत. आपण समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने भोसीकर कुटुंबाने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी गरजूंच्या अडचणीत धावून जात शहरात अनेक ठिकाणी तांदूळ व डाळींचे वाटप केले आहे.
याअगोदर भोसीकर कुटुंबीयांच्या वतीने कुपोषित बालकांना दत्तक घेऊन कुपोषणमुक्त केले. त्याच बरोबर, वीज पडून मृत्यू झालेल्या कटुंबातील लोकांना आर्थिक मदत, आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आर्थिक मदत, अपंगांना साहित्याचे वाटप, गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, गारपीट झालेल्या शेतकऱ्यांना मदत, आणि डिजिटल शाळा करण्यात आलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एलइडी, शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.
दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी मोफत मास्कचे वाटप देखील भोसीकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.