नांदेड - नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या 'बुथ' लेवल पर्यंतच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम करुन प्रताप पाटील चिखलीकर यांना निवडून आणले. मात्र, आता प्रताप चिखलीकर यांच्याकडून नांदेड महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असेल, तर भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगांवकर यांनी दिला आहे.
यावेळी खतगांवकर म्हणाले, संघटनात्मक बदलाचे काही निर्णय श्रेष्ठींना आवश्यक वाटल्यास नांदेड जिल्ह्यातील प्रमुखांना विश्वासात घेवुनच निर्णय घ्यावा, अन्यथा नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या हितासाठी पदाचा त्याग करण्याची तयारी असल्याचे खतगांवकर यांनी सांगितले.
मी स्वत:च्या प्राणात-प्राण असेपर्यंत भाजप सोडणार नाही. मात्र, स्वत:च्या व्यक्तीगत स्वार्थासाठी इतर पदाधिकाऱ्यांचा बळी घेणे कितपत योग्य आहे ? याचा श्रेष्ठींनी विचार करावा, असे खतगांवकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्याबरोबरच वरिष्ठ नेतृत्वाने प्रताप पाटील चिखलीकारांच्या प्रतापी वृत्तीला वेळीच आवर घालावा, अन्यथा भाजपमधील जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची नाराजी येणाऱ्या विधानसभा निवडणूकीमध्ये जाणवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही भास्करराव पाटील खतगांवकर यांनी दिला आहे.