नांदेड- माहूर शहरात नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या पवित्र उत्सवात मातेच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांची शहरात गर्दी होत आहे. मात्र शहरालगतच्या जंगलातील अस्वले मानवी वस्तीत येऊ लागली आहेत. माहूर शहरात अस्वलांचा मुक्त संचार दिसून येत आहे. त्यामुळे माहुरकरांमध्ये दहशत पसरली आहे.
टी-पॉइंटजवळ असलेल्या व्दारका ले-आउट, गजानन महाराज मंदीर, सोनापीर दर्गाह, कपिलनगर भागात एक अस्वल वावरत आहे. सकाळी व सायंकाळच्या वेळी ही अस्वल अनेकांच्या निदर्शनास आली आहे. काही हौसी नागरिकांनी या अस्वलाचे मोबाईलव्दारे शुटींग केरून ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाला सूचना दिल्या असता वनविभागाने अस्वलास हुसकावून लावले. मात्र तरी देखील अस्वल पुन्हा माघारी येत असल्याने शारदीय नवरात्र महोत्सवात येणार्या भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वन विभागाने या अस्वलास जंगलाच्या मध्यभागी दूरवर नेऊन सोडावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सतत दोन दिवसांपासून रात्रीला अस्वल शहरभर फिरत आहे. मात्र, आतापर्यंत त्याने कुणावरही हल्ला केला नाही. त्यामुळे हे अस्वल माणसाळलेले असावे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.
हेही वाचा-विधानसभा निवडणूक 2019 : खा.चिखलीकरांना दे धक्का... होमपीचवरची उमेदवारी शिवसेनेच्या वाट्याला..!
याबाबत जिल्हधिकारी अरुण डोंगरे यांनी उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांना अस्वलाचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वन्य प्राण्यांपासून बचावासाठी वनविभागामार्फत पूर्ण खबरदारी घेतली असून वन कर्मचार्यांची गस्त लावण्यात आली आहे. अस्वलास गस्तीवर असणार्या वनकर्मचार्यांनी हुसकावून जंगलात पाठविले आहे. भाविकांनी दर्शनास जाताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीधर कावळे यांनी केले आहे.