नांदेड - मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली केळीची रोपे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात लागवड केली होती. लागवडीनंतर अवघ्या दोनच महिन्यात रोपांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला व ती करपली. त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.
हेही वाचा - नांदेडमधील खरीप पीकांवर लष्करी अळीचा हल्ला; बळीराजा हतबल
अर्धापुर तालुक्यातील पार्डी येथील ५ ते ७ शेतकऱ्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे मे महिन्यात केळीच्या रोपांची नोंदणी केली होती. त्यानंतर जून व जुलै महिन्यात रोपांची लागवड केली. मात्र, दोन महिन्यांच्या कालावधीतच शेतातील रोपांची वाढ थांबली व रोगांचा प्रादुर्भाव वाढला तसेच केळीची रोपे करपण्यासही सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली असता त्यांनी केळीच्या रोपांची पाहणी केली. मात्र, त्यांनी शेतकऱ्यांना कोणतेही मार्गदर्शन न केल्याचे शेतकरी सांगत आहेत.
हेही वाचा - हातातोंडाशी आलेल्या कोथिंबीरीच्या शेतावर फिरवला ट्रॅक्टर...
गेल्या काही वर्षांपासून जेमतेम पावसाळा होत असल्याने तालुक्यात केळीचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, यावर्षी केळीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी केळीची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड झाली शेतकऱ्यांनी परभणीच्या कृषी विद्यापीठातून केळीची रोपे आणून त्यांची लागवडही केली. मात्र, त्यांच्या वाट्याला नुकसानच आल्याने घोर निराश झाले असल्याचे येथील शेतकरी सांगत होते.
सुनील भगवानराव मरकुंदे या शेतकऱयाने ४ हजार रोपाची लागवड केली, नंदकिशोर देशमुख यांनी २०००, अविनाश देशमुख यांनी २१००, गोविंदराव देशमुख यांनी २०००, रितेश देशमुख यांनी ३३०० केळीच्या रोपांची लागवड केली होती. रोपे करपल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा अशीच काहीशी परिस्थिती झाल्याने आता जगायचं कसं हा प्रश्न उभा राहीला आहे. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी विचारले याबद्दल असता ते म्हणाले, आमची यात काही चूक नाही. या नुकसानीला जबाबदार नसल्याचेही अधिकारी म्हणत आहेत. असे शेतकरी म्हणाले.
रोपांची पाहणी करून विद्यापीठाने नुकसानभरपाई द्यावी. अन्यथा आम्ही मराठवाडा कृषी विद्यापीठावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे शेतकऱ्याने सांगीतले आहे.